23
उरलेल्यांचे पुनरागमन
1 “जे मेंढपाळ माझ्या कुरणातून मेंढरांचा नाश आणि त्यांची पांगापंग करीत आहेत,” त्यांना हाय हाय! परमेश्वर असे म्हणतो, 2 यास्तव परमेश्वर, इस्राएलचा देव, त्या मेंढपाळांना, जे त्याच्या लोकांस चारतात, त्याविषयी असे म्हणतो, “तुम्ही माझ्या मेंढरांना विखरले आणि त्यांना घालवून लावले आहे. तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही. हे जाणून घ्या, मी तुम्हास तुमच्या वाईट कृत्यांबद्दल परत फेड करीन.” परमेश्वर असे म्हणतो. 3 “मी स्वत: माझ्या उरलेल्या कळपास ज्या सर्व देशात घालवला होता, त्यास एकत्र करणार, आणि त्यांना त्यांच्या कुरणात परत आणीन. मग ती सफल होऊन बहूतपट होतील. 4 मग मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन, जो त्यांना पाळील, म्हणजे ती घाबरणार नाहीत व भयभीत होणार नाहीत. त्यातील एकही हरवणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो.
5 परमेश्वर असे म्हणतो, पाहा! असे दिवस येत आहेत. “मी दावीदाकरीता नितीमान अंकुर उगवीन.”
तो राजा म्हणून राज्य करेल, तो देशात न्याय व न्यायीपण करील, आणि भरभराट घेऊन येईल.
6 त्याच्या दिवसात यहूदा तरला जाईल, आणि इस्राएल सुरक्षित राहील.
आणि ज्या नावाने त्यास हाक मारतील ते हे, म्हणजे परमेश्वर आमचे न्यायीपण* यहोवा-सिदकेनू असे असेल.
7 यास्तव परमेश्वर असे म्हणतो. पाहा! असे दिवस येत आहेत ज्यात, ज्या परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांस मिसर देशातून बाहेर आणले, तो जिवंत आहे असे म्हणणार नाहीत. 8 उलट ते असे म्हणतील, परमेश्वर जिवंत आहे, ज्याने इस्राएलाच्या वंशांना उत्तरेकडील देशातून आणि सर्व देशात ज्यात त्यांना घालवले होते, त्यातून बाहेर काढून वर चालवून आणले, असे म्हणतील.
खोट्या संदेष्ट्यांचा निषेध
9 संदेष्ट्यांबद्दल माझे हृदय माझ्या आत तुटले आहे आणि माझी सर्व हाडे थरथरत आहेत. कारण परमेश्वर व त्याच्या पवित्र वचनांमुळे,
माझी स्थिती मद्यप्यासारखी झाली आहे.
ज्यावर द्राक्षरस हावी झाले आहे,
10 कारण व्यभिचाऱ्यांनी राष्ट्र भरला आहे, यास्तव राष्ट्र शोक करीत आहे.
रानातील कुरणे वाळून गेली आहे. संदेष्ट्यांचे मार्ग दुष्ट आहेत, ते त्यांची शक्ती चुकीच्या पद्धतीने वापरतात.
11 कारण संदेष्टेच काय, पण याजकसुद्धा विटाळले आहेत. माझ्या मंदिरात त्यांची दुष्कृत्ये आढळली आहेत, परमेश्वर असे म्हणतो.
12 यास्तव त्यांच्या मार्ग त्यांचा अंधारात निसरड्या मार्गा सारखा होईल. ते खाली ओढले जातील, ते त्यामध्ये पडतील.
कारण त्यांच्या शिक्षेच्या वर्षी मी त्यांच्याविरुद्ध अरिष्ट पाठवीन, असे परमेश्वर म्हणतो.
13 “शोमरोनच्या संदेष्ट्यांनी चुकीच्या गोष्टी केल्याचे मी पाहिले. मी त्यांना बाल या खोट्या दैवताच्या नावाने भविष्य वर्तविताना पाहिले.
आणि त्यांनी इस्राएलाच्या लोकांस चूकीच्या मार्गास नेले.
14 आणि मी यरूशलेमामधल्या संदेष्ट्यांना भयंकर गोष्टी करताना पाहिले आहे. त्यांनी व्यभिचार केला आणि दुष्टतेत चालले.
ते दुष्टांचे हात मजबूत करतात, कोणीही आपल्या दुष्टाईपासून फिरले नाहीत.
ते सर्व मला सदोमासारखे आणि तिच्यातले राहणारे गमोऱ्यासारखे झाले आहेत.”
15 यास्तव सेनाधीश परमेश्वर संदेष्ट्यांबद्दल असे म्हणतो, “मी त्यांना कडू दवणा खावयास देणार आणि विषमिश्रित पाणी पिण्यास देणार.”
कारण यरूशलेमेतल्या संदेष्ट्यांकडून अशुद्धपणा निघून सर्व देशात पसरला आहे.
16 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “हे संदेष्टे तुम्हास जे काय भविष्य सांगतात त्याकडे लक्ष देऊ नका.
त्यांनी तुम्हास भ्रमात पाडले आहे! ते त्यांच्या मनाचेच दृष्टांत सांगतात.
17 माझा अपमान करणाऱ्यांना ते सतत बोलत राहतात की, परमेश्वराने तुम्हास शांती देऊ केली आहे,
आणि प्रत्येकजण आपल्या हृदयाच्या हट्टीपणाच्या वाटेने चालतात आणि म्हणतात, तुमच्यावर कोणतीच आपत्ती येणार नाही.
18 पण परमेश्वराच्या मसलतीच्या सभेत त्याचे वचन पाहायला व ऐकायला कोण उभा राहील? त्याच्या शब्दांकडे लक्ष देऊन कोण ऐकेल?
19 पाहा! परमेश्वराकडून वादळ येत आहे. त्याचा राग बाहेर जात आहे, आणि ती क्रोधाच्या वादळाची भोवळ आहे.
ती दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.
20 परमेश्वराने आपल्या हृदयातील हेतू सिद्धीस नेई पर्यंत, त्याचा राग परतणार नाही.
शेवटल्या दिवसात तुम्हास हे समजेल.
21 मी त्या संदेष्ट्यांना पाठवले नाही, पण तेच संराष्ट्र द्यायला धावले. मी त्यांच्याशी काही बोललो नाही, पण तेच माझ्यावतीने भविष्य करतात.
22 कारण जर ते माझ्या सभेत उभे राहिले असते, तर ते माझ्या लोकांस माझे वचन ऐकण्याचे कारण झाले असते.
त्यांनी त्यांच्या दुष्कृत्यांपासून आणि कर्मांच्या दुष्टतेपासून फिरवले असते.”
23 परमेश्वर असे म्हणतो, “मी काय फक्त जवळचा देव आहे आणि दूरवरचा देव नाही काय?”
24 परमेश्वर असे म्हणतो, कोण असा आहे जो गुप्त ठिकाणी लपतो म्हणजे मी त्यास पाहू शकणार नाही?
मी स्वर्ग आणि पृथ्वी भरून उरलो नाही काय?
25 संदेष्टे माझ्या नावाने खोटे भविष्य करतात, ते म्हणतात, मला स्वप्न पडले आहे! मला स्वप्न पडले आहे! मी त्याना असे म्हणताना ऐकले आहे. 26 संदेष्ट्ये जे खोटे भविष्य सांगतात आणि आपल्या हृदयाच्या दुष्टपणाने विचार करतात हे किती काळ चालणार? 27 हे संदेष्टे, ऐकमेकांना खोट्या स्वप्नाबद्दल सांगून माझ्या लोकांस माझ्या नामाचा विसर व्हावा असा प्रयत्न करीत आहेत. जसे ह्यांचे पूर्वज बालामुळे माझे नाव विसरले. 28 संदेष्ट्याला स्वप्न सांगायचे असेल, तर त्यास सांगू द्या. पण ज्या कोणाला मी काही घोषीत करतो, त्याने माझे वचन सत्याने सांगावे.
गव्हा पुढे गवत ते काय? परमेश्वर असे म्हणतो.
29 माझा संराष्ट्र अग्नीप्रमाणे नाही काय? परमेश्वर असे म्हणतो. आणि तो खडक फोडणाऱ्या हातोड्याप्रमाणे नाही काय?
30 परमेश्वर असे म्हणतो “म्हणून पाहा! मी खोट्या संदेष्ट्यांविरूद्ध आहे, जे एकमेकांकडून माझे शब्द चोरतात आणि म्हणतात ते माझ्याकडून आले आहेत.
31 परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी संदेष्ट्यांविरूद्ध आहे, जे त्यांची जीभ भविष्यवाणी करण्यासाठी वापरतात. 32 परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी त्या संदेष्ट्यांविरूद्ध जे फसवे स्वप्ने सांगतात, म्हणजे ते त्यांच्या खोट्या बोलण्याने व बढाईने माझ्या लोकांस चुकीच्या मार्गांने नेतात. कारण लोकांस शिकविण्यासाठी मी त्यांना पाठविलेले नाही. मी त्यांना माझ्यासाठी काही करण्याची आज्ञा कधीही दिलेली नाही. ते या लोकांस खचित मदत करु शकत नाहीत.” परमेश्वर असे म्हणतो. 33 “जेव्हा हे लोक व संदेष्टे किंवा याजक तुला विचारतील की ‘परमेश्वराने काय घोषणा केली आहे?’ तेव्हा तू त्यांना सांग, कोणती घोषणा? कारण मी तुम्हास टाकले आहे, परमेश्वर असे म्हणतो. 34 आणि संदेष्टे व याजक किंवा जो कोणी म्हणेल ‘परमेश्वराची घोषणा ही आहे.’ मी त्यास व त्याच्या सर्व घराण्याला शिक्षा करीन. 35 तुम्ही प्रत्येक आपल्या भावाला आणि आपल्या शेजाऱ्यास असे विचारु शकता, ‘परमेश्वराने काय उत्तर दिले?’ किंवा ‘परमेश्वर काय म्हणाला?’ 36 पण तुम्ही कधीही परमेश्वराच्या ओझ्याची आठवण करुच नका, कारण प्रत्येकाला आपापलेच वचन ओझे असे होईल, कारण जिवंत देव, सेनाधीश परमेश्वर, आमचा देव याची वचने तुम्ही विपरीत केली आहेत. 37 तुम्ही संदेष्ट्याला असे विचारा, ‘परमेश्वराने तुला काय उत्तर दिले’ किंवा ‘परमेश्वर काय म्हणाला?’ 38 आणि ‘परमेश्वराची घोषणा काय आहे?’ असे म्हणून नका. जर तुम्ही असे शब्द वापराल, तर परमेश्वर तुम्हास म्हणेल, तुम्ही माझ्या संदेशाला ‘परमेश्वराची घोषणा असे म्हणू नेय.’ हे शब्द वापरु नका असे मी बजावले. 39 म्हणून मी तुम्हास व जे नगर मी तुम्हास व तुमच्या पूर्वजांना दिले ते मी आपल्या समक्षतेपासून दूर फेकून देणार. 40 मी तुम्हावर कधीही विसरु शकणारी अप्रतिष्ठित आणि बदनामी ही आणीन.”