2
श्रीमंत व गरीब ह्यांच्याशी वागणूक
1 माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे तुम्ही पक्षपाताने वागू नका 2 कारण तुमच्या सभास्थानात कोणी सोन्याची अंगठी घालणारा, भपकेदार कपड्यातला मनुष्य आला आणि तेथे मळक्या कपड्यात कोणी गरीबही मनुष्य पण आला, 3 तर भपकेदार झगा घातलेल्या मनुष्याकडे तुम्ही आदराने पाहता व त्यास म्हणता की, “इथे चांगल्या जागी बसा”; आणि गरिबाला म्हणता, “तू तिथे उभा रहा,” किंवा “इथे माझ्या पायाशी बस.” 4 तर, तुम्ही आपसात भेद ठेवता आणि दुष्ट विचार करणारे न्यायाधीश झालात ना?
5 माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही? 6 पण तुम्ही गरिबांना तुच्छ मानले आहे. जे श्रीमंत आहेत ते तुम्हास जाचतात आणि न्यायालयात खेचून नेतात की नाही? 7 आणि तुम्हास जे उत्तम नाव ख्रिस्तात मिळाले त्या चांगल्या नावाची ते निंदा करतात ना? 8 खरोखर, “तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” या शास्त्रलेखातील राजमान्य नियम जर तुम्ही पूर्ण करीत असाल तर तुम्ही चांगले करीत आहात. 9 पण तुम्ही पक्षपात बाळगीत असाल तर तुम्ही पाप करता आणि उल्लंघन करणारे म्हणून नियमशास्त्राकडून तुम्ही दोषी ठरवले जाता. 10 कारण कोणीही मनुष्य संपूर्ण नियमशास्त्र पाळतो आणि एखाद्या नियमाविषयी अडखळतो, तरी तो सर्वांविषयी दोषी ठरतो. 11 कारण ज्याने म्हणले की, “व्यभिचार करू नको,” त्यानेच म्हणले की, “खून करू नको” आता, तू जर व्यभिचार केला नाहीस, पण तू खून केला आहेस तर तू नियमशास्त्र उल्लंघणारा झालास. 12 तर स्वातंत्र्याच्या नियमाप्रमाणे ज्यांचा न्याय होणार आहे त्यांच्याप्रमाणे बोला आणि करा. 13 कारण, ज्याने दया दाखवली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल व दया न्यायावर विजय मिळवते.
श्रद्धा व कार्य ह्यावर सूचना
14 माझ्या बंधूंनो, कोणी मनुष्य म्हणत असेल की “माझ्याजवळ विश्वास आहे”; पण त्याच्याजवळ जर कृती नाही, तर त्यास काय लाभ? विश्वास त्यास तारू शकेल काय? 15 जर कोणी भाऊ उघडा असेल किंवा कोणी बहीण उघडी असेल आणि रोजच्या अन्नाच्या अडचणीत असेल, 16 आणि तुमच्यातील कोणी त्यांना म्हणेल की, “शांतीने जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा,” पण शरीरासाठी लागणार्या गोष्टी जर तुम्ही त्यांना पुरवीत नाही, तर काय लाभ? 17 म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे. 18 आता, कोणी मनुष्य म्हणेल की, “तुझ्याजवळ विश्वास आहे आणि माझ्याजवळ कृती आहेत.” तुझ्या कृतींशिवाय तुझा विश्वास मला दाखव आणि मी माझ्या कृतीवरून माझा विश्वास तुला दाखवीन. 19 एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? भूतेसुद्धा विश्वास धरतात व थरथर कापतात. 20 परंतु मूर्ख मनुष्या, कृतीशिवाय विश्वास निरर्थक आहे, हे तुला समजावे अशी तुझी इच्छा आहे काय? 21 आपला पूर्वज अब्राहाम ह्याने आपला मुलगा इसहाक ह्याला जेव्हा यज्ञवेदीवर अर्पण केले, तेव्हा तो कृतीनी नीतिमान ठरला नव्हता काय? 22 आता, त्याच्या कृतीबरोबर विश्वासाने कसे काम केले आणि त्या कृतीकडून विश्वास पूर्ण केला गेला, हे तुला दिसते का? 23 ‘अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व गणण्यात आले’, हे म्हणणारा शास्त्रलेख पूर्ण झाला आणि त्यास देवाचा मित्र म्हणण्यात आले. 24 तर तुम्ही हे पाहता की, कोणी मनुष्य केवळ विश्वासाने नाही, पण कृतीनी नीतिमान ठरतो. 25 तसेच राहाब वेश्येने जेव्हा जासुसांना आत घेतले व दुसर्या वाटेने पाठवून दिले, तेव्हा ती कृतीनी नीतिमान ठरली नाही काय? 26 कारण ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर निर्जीव आहे त्याचप्रमाणे कृतीशिवाय विश्वास निर्जीव आहे.